भाई अभयारण्य म्हंटल की घनदाट जंगल, रानटी पक्षी, रातकिड्यांचे आवाज, पालापाचोळा, हे सगळं आलाच की ना रे! आपण मस्त अश्या हटके ट्रेक ला जायचं का... आशुतोष.
हा आश्या मस्त पैकी सेव्हन अप ऍड सारखं अगदीच काहीतरी तुफान करूयात.
मनीष उर्फ मन्या आणि धनंजय उर्फ धन्या आशुच्या हटके प्लॅन मध्ये सहभागी होत होते.
आताच्या रोजच्या रुटिंगला कंटाळलेले हे तिघेही फेमस 'कॉलेज कट्टेकरी सबसे हटके करी' ह्या बिरुदावलीतील जानेमाने दोस्त.
कॉलेज लाईफ झाल्यावर तिघेही एकाच क्षेत्रात मात्र वेगवेगळ्या कंपनीत रुजू झाले होते. ऑन ड्युटी चोवीस तास आयटी इंडस्ट्रीतले 24/7 शिफ्ट मध्ये काम करणारे थकले भागलेले सबसे हटके जीव.
फायनली तिघांनीही आपापल्या ऑफिसमध्ये सुट्टी मिळवली ती आठवडाभराची शेड्युलडेड कामं पूर्ण करण्याच्या अटीवरच.
आयटी इंडस्ट्री म्हणजे संपूर्णतः संगणकाच्या जीवावर उदार होऊन मनुष्यबळाच्या जोरावर काम करणारा परी संगणकाच्या आहारी गेलेला समाज.
मन्याची ही व्याख्या त्याच्या टीम मध्ये जोर धरू लागली होती. सर्वांचीच गत एकच ना! असो.
दिवसभरात सर्वी कामे आटोपून लवकरात लवकर आपापल्या ऑफिस मधून बाहेर पडायचे या एकमेव ध्येयाने पिछाडलेल्या तिघांना आज संगणकाने जणू मिठीच मारली होती.
झाले असे की आपल्या धनंजयच्या संगणकावरील डेटाबेस(माहिती) हॅक झाले. हे त्याला डेटाबेस अप्लिकेशन सपोर्टवर काम करणाऱ्या त्याच्या मित्राकडून समजले. म्हणजे सिनिअरकडून मेलचा पाऊस एव्हाना पडला असेलच फक्त आता स्वतःवर कोसळायचा तेवढा बाकी आहे हे त्याला कळून चुकले. आपल्या सुट्टीचं सोडा घरी जायला भेटेल की नाही हाच अबब प्रश्न आ वासून त्याच्याकडे पाहत होता.
बऱ्याच डिटेल मध्ये गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की ज्या क्लायंट(अशी कंपनी ज्यांनी आपली काही कामे दुसऱ्या कंपनीच्या डिपार्टमेंटकडे सोपवली असतात) चा डेटा हॅक झालाय त्या प्रोजेक्टवर आपला मनीष आहे.
म्हणजे एकूण काय तर धन्या आणि मन्या दोघेही डेटा रिकव्हर झाल्याशिवाय कुठेही हलू शकत नव्हते.
दोघांचे एकमेकांशी बोलणे झाले व त्यांनी कॉन्फरन्स कॉल द्वारे आशुतोषला सविस्तर वृत्त कळवले.
तिघांची झालेली निराशा एकमेकांना आवाजातून स्पष्ट कळत होती.
रात्रभर सपोर्ट टीमला हाताशी धरून डिटेल्स सहित बॅकअप पूर्ण घेतला गेला व फार उशिराने का होईना धनंजयने डेटा रिकव्हर करत अँटिव्हायरस प्रॉपर वर्क करतोय की नाही हे टेस्टिंगही स्वतःच करून क्लायंट कडून फीडबॅक घेऊन मॅनेजरला रिपोर्ट मेल केले.
हे एवढं धडाडीने केले गेले की त्यात फक्त सुट्टीवर जायची ओढ होती अर्थात मित्रांचा लळा, प्रेम, आपुलकी, दिलेला शब्द आणि झिंगाट ओतून काम केले गेले होते. धडाधड एकमेकांना फोन कॉल करून कन्फर्मेशन दिले गेले.
'दिल दोस्ती दुनियादारी त्यात आपली जबाबदारी' हा टॅग लावून आशु मोकळा झाला होता. मोकळा म्हणजे हातावर हात तोंडावर बोट असे नव्हे तर अळीमिळी गुप चिळी करत त्याने गाडी, सर्वांचा खाऊ सामान-सुमान कपडे सगळं अगदी व्यवस्थित रेडी करून दोघांना पिकअप करण्याच्या तयारीत हजरजबाबीपणा दाखवला होता.
गाडी पळत डुलत 'हारी बाजी को जितना हमे आता है करत' चालली. आशुतोष ड्राईव्ह करत होता.
एवढ्या गाण्यांच्या मैफिलीतही हे दोघं छान झोपा काढत होते. चहाच्या टपरीवर गाडी थांबली तशी दोघांची झोप उडाली. त्याला कारण आशु ने मारलेला धक्के देत देत ब्रेक.
खरं तर धक्के न्हवते ते इय्या इय्या करत आशु ने केलेली निद्रा भंग करणारी इशारा वजा सूचना होती.
ह्याला चहाची टपरी दिसली असणार म्हणून दोघेही न बडबडता उतरले.
गर्द हिरवी झाडे, पावसाने नुकताच चिंब भिजलेला रस्ता, मातीतील सुगंध, वातावरणातील आल्हादायकता आणि मस्त चहाचा घोट.
अहाहा... काय सुंदर चहा आहे मामा... बरं वाटलं.
टपरीवरील मामाने मान डोलावून एक स्मित केले.
आपण थोड्यावेळ बसूयात का रे इथे? कसलं भारी वाटतंय रे!
मन्याच्या वाक्याला संमती दर्शवत तिघेही थोड्यावेळ निवांत शांततेत बसले.
बराच वेळ कोणीच काही बोलले नाही, फक्त निसर्ग अनुभवत होते.
नक्की काय लोचा झाला रे ऑफिसमध्ये? आशूच्या प्रश्नवजा टॉपिक कम शांतता असहाय्य होणाऱ्या मनाने हा विचारलेला गॉसिपिंग सहाय्यक प्रश्नचिन्हाला आपली प्याक प्याक चालू करा हे कव्याक(quack) कव्याकने दिलेला इशारा आज्ञा शिरसावंद मानून दोघांनी बोलण्यास प्रारंभ केला.
अखेर शांतता भंग पावली आणि त्याची जागा कुतुहूल कम ट्विट ट्विट ने घेतली.
आता सगळं कसं आलबेल वाटतेया. वातावरण हलकं झालया बघा.
आशूच्या खट्याळ स्वभावाची जाणीव असलेले दोघे खळखळून हसले.
'मुसफिर हू यारो ना घर है ना ठिकाणा मुझे बस चलके जाना है'... काय रे धन्या काय झाला बावा, असं वळवळल्यावाणी काय हे? आशु बोलला.
असे वळवळणारे हे किडे गाण्यावाणी इकडून तिकडे नुसते फिरतच असतात रे. एवढं अँटीवायरस असून पण काय कामाचं नाही. आपल्या डोक्याचा वापर करून आपण चांगल्या गोष्टी करायच्या आणि कोणी अति की शुन्य बुद्धिमान विघ्नसंतोषी माणसांनी वायरस बनवून त्यावर पाणी सोडायचं.
हे बिनडोक संगणक त्याला बळी पडतात आणि बकरा मात्र आपण बनतो.
विघ्नसंतोषी.... हा हा हा हा हा... भारी नामकरण केलंस रे! हॅकर ला विघ्नसंतोषी बोलल्यास जास्तच प्रभावी दिसतोय... मन्या बोलला.
अरे तुला आठवतंय तो 'नाना करते प्यार तुमसे कर बैठे' वाला नाना बैठेकर? पुस्तकी किडा... कीडा कसला गोचिडा होता तो... आशु.
आता त्याच काय मध्येच... धन्या बोलला.
अरे जसा पुस्तकी किडा तसेच हे संगणकावरचे किडे. नको तिथे नको ते उद्योग करतात नि तुमच्या आमच्या सारख्यांना कामाला लावतात.
तेव्हा पण काय कमी ओरडा मिळायचा आपल्याला त्याच्यामुळे. फरक इतकाच की तिथे गुरुवर्य आणि इथे ऑफिसवर्य.
तिघांना हसू आवरले नाही मात्र नकळत वातावरणात गंभीरता आली.
आपल्या राजकारणात पण लय किडे आहेत ना रे भावा. पप्पूडा, केज्जूडा, आपाडा... ह्या शेवटून 'डा' च्या सिरीज वाले आपली डाळ शिजवून लोकांना भुंगे बनवून टाकतात ना रे! राजकारणातले अफलातून 'डा' वायरसचे प्रकार. हो आशु खरंय..आशुतोष भलताच गंभीर झालेला पाहून मन्याने विषय हलका करण्याचा प्रयत्न केला.
अरे आपल्या फेसबुक वर पण नाही का एस्ट्रो नावाचा ऍप आलाय. तुम्हाला लोक काय समजतात? तुमच्या विषयी ती काय विचार करते? असे एक ना अनेक प्रश्न ज्यांची उत्तर आपल्याला मानविकृत संगणक देतो आणि आपणही त्या ऍपला बिनधास्त भेट देऊन जाणून घेतो.
हेच करत असताना त्या वेबसाईट वर असंख्य ऍड चालू असतात आणि नकळत आपला डेटा त्याद्वारे चोरला जातो. मग ह्यात मार्क करून झुकरबर्ग तरी काय करणार. अशाने बर्गर टिका पण मिळायचा नाही.
हा खरंय ह्या लसी पण किती आणि कश्या पुऱ्या पडणार म्हणा.
ह्या लसी जरी त्यांना शोधून आपले काम चोख बजावत असले तरी अजूनही बऱ्याच नव्या किड्यांचा वावर वाढतच आहे.
पुन्हा आशु ने आपल्या स्वभावाला धरून अँटीवायरस चे नामकरण 'लसीकरण' मध्ये केले.
मन्या, आशु अरे खरं तर अश्या बऱ्याच कंपन्या आहेत ज्या ह्या किड्यांना लसीकरणाचे डोस पाजतात. त्यातही बऱ्याच कंपन्या अश्या आहेत ज्या स्वतः अगाऊ अश्या लसी बनवतात जे किडे/ वायरस अजून वळवळायचे आहेत.
म्हणजे इथेही करप्शन आहेच.
'होम प्रॉडक्ट कंपनी' स्वतः किडे बनवा त्यावर स्वतः मलम लावा आणि बक्कळ पैसे कमवा.
वाह वाह वाह.... माझ्या धन्या काय बोललास! लय हुश्शSS हुश्शआSSर हाय पोरं आमचं.
आशुतोषच्या बोलण्याला दाद देत मनीष आणि धनंजय दोघेही मनसोक्त हसायला लागतात.
एव्हाना त्यांचे चहाचे सात राऊंड होऊन गेले होते.
आणि पुन्हा एकदा....
मामा... 3 कटिंगsssss...
मैत्री ही अशीच असते, संगणकासारखी कॉपी पेस्ट करते आणि व्यक्ती वल्ली करत मनाचा धागाही अलगद घट्ट विणते.
तिघेही निघाले.... संगणक गॉसिप शट डाऊन करून ते 'रोमिंग मोड ऑन' करत.
सोबतीला वाऱ्याची झुळूक आणि बॅकग्राऊंडला...
हम है राही प्यार के चलना अपना काम
पलभर मे हो जाएगी हर मुश्किल नाकाम
हौसला ना हारेंगे हम तो बाज़ी मारेंगे...
- अनुप्रिया सावंत.

No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.