Thursday 6 December 2018

शिदोरी - दोन सुयांची


     थंडीच्या वातावरणातील संध्याकाळचा गारवा मनाला एकदम प्रफुल्लीत करतंय ना! सोबत वाफाळता चहा आणि चवीला कांदा भजी हे समीकरण तर मला ऑल टाईम भन्नाट वाटतं. काय वाटतं? कधी थकली, दमली, उल्हासित असली किंवा अगदी चिडलेली जरी असली तरी चहाशी मी कधीच रुसत नाही. निवांतपणे तर ह्याची माझी जास्तच गट्टी जमते. चहा व त्याची वाफाळती वाफ जणू अस्पष्ट धुकचं भासतात, जे मला माझ्या मनाच्या गावी अलगद घेऊन जातात.

     माझी आई, मी व चहा ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या की गप्पांना अगदी उधाण येतं. खासकरून थंडीच्या ह्या दिवसात मला आईच्या खास दोन सखी आवर्जून आठवतात.
हो, माझ्या आईच्या दोन खास आवडत्या सख्या आहेत. त्या आईच्या आवडत्या आहेत, की आई त्यांच्या आवडती, हे माझ्यासाठी एक गमतीशीर विधान आहे. ह्या दोन सख्या म्हणजे दोन सुया/निडल्स. आश्चर्य वाटलं ना! हो खरच. 

     ह्या निडल्सने ती जेव्हा तिच्या बाळांसाठी स्वेटर विणते तेव्हा तिला जो आनंद होत असतो, तो पाहणं हा माझा छंद आहे. हा छंद जोपासणं माझा ध्यास आहे.  ह्या दोन निडल्सची गोष्ट ऐकताना मन पूर्ण हरखुन जातं.  अफाट प्रेम, वात्सल्य, करूणा ह्यांचे मूर्तिमंत रुप असणारी ही माझी आई तिच्या लेकीची ओटी भरताना तिची शिदोरी जोडत असते, ते तिच्या प्रत्यक्ष कृतीनेच.

     आपण आपल्या बाळासाठी त्याला थंडी वाजू नये म्हणून कानटोपी, हातमोजे, स्वेटर हे घालून छान कव्हर करतो ना! मात्र अशी बाळं ज्यांना थंडी वाजते पण अंगावर घ्यायला चादरही नसते, घालायला स्वेटर नसतो, ना कान झाकायला रुमाल.  मग अशा बाळाची काळजी कोण करत असतं?  ही माझी आई मात्र हे करत असते आणि करवूनही सहज घेते.  ना कधी दमत, ना थकत, ना थांबत, ही फक्त कष्ट करत असते. तेही Unstoppable. Yes!

     आईच्या पदरात लपण्याची, खेळण्याची मज्जा वेगळीच असते ना! ह्याच पदराने जेव्हा ती लेकीची ओटी भरते तेव्हा मुलगी तीची शिकवण शिदोरी रुपी जपत असते.  हो ना!

   आपण प्रत्येक जण काही ना काही कामात अडकलेलो असतो.  रस्त्याने जाताना येताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, जाणवत असतात.  मात्र काही गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तर काही गोष्टी आपल्याला माहीत असून पण त्यासाठी काही करता येत नसतं. 

     रस्त्यावर आपल्याला अनेक लहान बाळ किंवा वृद्ध वयस्क स्त्री पुरुष दिसतात.   ज्यांना अंगावर नीट कपडेही नसतात. मग थंडीपासून संरक्षण करताना त्यांची तारेवरची कसरत होते. मुंबईची थंडी आणि गावाकडची थंडी ह्यात तर जमीन अस्मानचा फरक. तुटपुंज्या पगारावर घर खर्च चालवताना अनेक कुटुंब अनेक गोष्टींचा सामना करत असतात.  

     मग आशा ह्या बाळांना, कुटुंबांना आपल्या इथून स्वेटर विकत घेऊन देऊयात का? आई हे सांगत असताना आईचं बोलणं मध्येच थांबवत माझा प्रश्न मी आईला विचारला.

    जगात कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही ही माझ्या आईची शिकवण आहे.  प्रत्येक गोष्ट कष्ट करून घ्यायची असते आणि मग त्याचे रसाळ फळही आपल्याला परमेश्वर तितकेच गोड देतो.  हा माझ्या आईचा ठाम विश्वास. आईच्या हातात नेहमीच विणण्याचे निडल्स असायचे, ज्याने ती स्वेटर बनवायची.  तिला आम्ही सर्वच नेहमी सांगायचो, अगं आई आपण विकत घेऊन देऊयात ना!  कशाला स्वतःचा वेळ घालवतेस, तेवढा आराम मिळेल तुला. उगाच ते निडल्स आणायला दुकानात जायचं पुन्हा तासनतास विणत राहायचं,  हात किती दुखतात त्याने. पण आई आम्हाला फक्त छान स्माईल द्यायची. त्या हसण्यात वेगळीच प्रसन्नता लाभयची. 

    जस जसे मोठे होत गेलो तशी आईची शिकवण फुलत गेली.   हळूच स्मित हास्य करत आई आम्हाला ह्या निडल्सची गोष्ट त्याचे महत्व शिदोरी रूपाने द्यायला लागली. घरची, ऑफिसची, बाहेरची कामे तसेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनही तिचं निडल्स वरचं प्रेम कधीही कमी झालं नाही.  आणि तिच्या सवयीने ते प्रेम तिने आमच्याही ओटीत द्यायला सुरुवात केली.  आणि आम्ही कधी त्यात रमलो ते कळलंच नाही.

     आईच्या दोन सख्या म्हणजे ह्या दोन निडल्स 'भक्ती' व 'सेवा' ह्याचे प्रतिक आहेत.   कालांतराने हळु हळू हयाचेे स्ववरुपही कळत गेले.  आई हेे स्वेटर 'कोल्हापूर मेडिकल कॅम्प' मधील तिच्या बाळांना देण्यासाठी करत असते.  तिची बाळं हे स्वेटर घेताना व ते घालताना त्यांना जितका आनंद होतो, त्याच्यापेक्षा अधिक आनंद ह्या माऊलीला होताना पाहताना भान हरपून जाते.  आपल्या आईला असं आनंदात पाहणं हे प्रत्येक बाळाला हवंहवंसच असतं ना!  तो आनंद, तो उत्साह जेव्हा आपल्या आईकडूनच आपल्याकडे येतो तेव्हा खरच मनाला 'भक्तिभाव चैतन्य' लाभल्या सारखं वाटतं. खरंच!

     आई नेहमी सांगते, आपण जेव्हा ह्या दोन निडल्स घेऊन स्वेटर विणतो तेव्हा आपण 'भक्ती' आणि 'सेवा' ह्या परमेश्वराच्या आवडत्या गुणांना जोपासत असतो. आणि ह्यातून आपला सर्वांगीण विकास होत असतो. 


हल्ली धावपळीच्या जीवनात मनाला शांतता फार कमी मिळते. जरा मोकळा वेळ भेटला की असं वाटतं सगळं सोडून आईच्या पदराखाली लहान होऊन मनसोक्त बागडावं, तिची शिदोरी अनुभवावी. हा चहा, कसा मस्त आईच्या शिदोरीची सफर घडवून आणतो ना! माझ्या विचारांची तंद्री भंग करता नेमका फोन खाणाणला. इंकमिंग कॉल... आईsss!....
काय म्हणताहेत माझ्या दोन्ही सख्या? हाहा...

     जणू तिला बसल्या जागीच कळालं माझ्या मनातले विचार. आईच ना ती. आपल्या लेकीच्या मनातले कळणार नाही, असं कसं होईल?

     सेवा आणि भक्ती हे संसारातून परमार्थ करताना कसे साधायचे? ह्याचा मार्ग मला माझ्या आईने ह्या दोन निडलच्या साहाय्याने ओटी स्वरूपात दिल्या.   तिची ही शिदोरी तिच्या प्रत्येक बाळांसाठी आहे.   निःस्वार्थ प्रेम, निःस्वार्थ भक्ती आणि निःस्वार्थ सेवा परमेश्वराला अतिशय प्रिय आहेत.  आणि ही गोष्ट माझी आई तिच्या लेकींकडून अगदी सहज करून घेते.  तिची अपेक्षा , ईच्छा एकच आपल्या लेकीचं चांगलं व्हावं.   लेकींच्या संसाराची वेल फुलवताना भक्ती व सेवा घडवून तिचा प्रपंच सुखात करण्यासाठी माझी आई तत्पर असते.  ही तिच्या दोन सख्यांच्या साहाय्याने येणाऱ्या संकटातील काटे अगदी सहजच बाजूला काढते.  माझी आई आहेच सॉलिड, सेवेला भक्तीची जोड देऊन आयुष्यात भक्तिभाव चैतन्य निर्माण करणारी.  अशी सेवा, ज्याने.....
        जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यु लागो सार्थकी ।

     सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ‘अहिल्या संघा’ तर्फे ‘वात्सल्याची ऊब’ हा उपक्रम राबविण्यात येतो.  ज्या स्त्री श्रद्धावानांना स्वेटर्सचे विणकाम करण्याची इच्छा आहे, अशा स्त्रियांना अहिल्या संघातर्फे विनामूल्य विणकामाचे प्रशिक्षण दिले जाते.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ/ वेबसाईटला भेट द्या:
https://aniruddhafoundation.com/compassion-vatsalyachi-oob/

                           - अनुप्रिया सावंत.

1 comment:

  1. २ सुयांचे खूपच सुंदर वर्णन केलेस अनुप्रिया.

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.